*कृषी महोत्सव : शेतकरी ते ग्राहक नाते दृढ करण्याचा संकल्प.....*
==============
ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तीन वर्षाच्या कालावधी नंतर अमरावती जिल्ह्यात शांती इव्हेंट मॅनेजमेंट व युवा स्वाभिमान या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दि १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०२३ या दरम्यान जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवासाठी सायन्स कोअर मैदानावर गेल्या चार दिवसा पासून शेतकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक संघटना युवा स्वाभिमानच्या वतीने या कृषी महोत्सवाचे हे ४ थे वर्ष होते.या चार दिवसात हजारो शेतकरी बांधवानी आपल्या कुटुंबासमवेत या आगळ्या वेगळ्या महोत्सवाला आपली हजेरी लावली. या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने चार दिवस कृषी क्षेत्रातील पंढरी अवतरली होती. देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलावे त्यांची जीवन्नोती व्हावी यासाठी राज्य व केंद्रसरकार अशा शेतकरी महोत्सवाचे नेहमीच आयोजन करीत असते.त्याचाच एक भाग म्हणून या महोत्सवात शेती व्यवसायाशी संबंधित विविध छोटे मोठे १७५ स्टॉल्स उपलब्ध होते.त्यामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करताना लागणारे बी बियाणे, खते, सेंद्रिय तसेच रासायनिक औषधे,शेतीला लागणारी अवजारे,फवारणी, मळणी यंत्रे,विविध कंपन्याचे ट्रॅक्टर, विक्रीसाठी उपलब्ध होते. त्याच प्रमाणे शेतकरी महिला बचत गटाने तयार केलेल्या चविष्ट खाद्य पदार्थांची अधिक रेलचेल बघायला मिळाली.अनेक शेतकऱ्यांनी यावेळी विविध वस्तू खरेदी केल्या. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना खाजगी संस्थांच्या कृषी महोत्सवात नसते पण या महोत्सवात ती दिसून आली.शेती उद्योगाला नव्या दिशा देणाऱ्या परिषदेसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे दालन या महोत्सवाच्या रूपाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघायला मिळाले. एकीकडे यात्रा व जत्रा या जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळी सुरू असतांना राणा दाम्पत्यांनी योग्य नियोजनाने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अधिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच धोरणात्मक बदलाचा पाया घालण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते हे विशेष.
पुढे येणाऱ्या काळात अशा कृषी महोत्सवाचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे,कृषीविषयक तंत्रज्ञान,शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे कारण सेंद्रिय शेतीतून कमी खर्चात उत्पन्न अधिक वाढवता येते यावर अधिक भर दिला जात आहे.शेतकरी, शास्त्रज्ञ, आणि संशोधन विस्तार, विपणन साखळी सक्षमीकरण, शेतकरी ते ग्राहक यांचे दरम्यान थेट विक्री शुंखला विकसित करणे या उद्देशाने कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान,व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचीही मदत यापुढे घेतली जाणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
आज चवथ्या दिवशी जिल्ह्यातून विविध गावातून आलेल्या शेकडो शेतकरी भगिनींनी मकर संक्रांती निमित्ताने खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या उपस्थिती मध्ये आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, माता रमाई यांचे साक्षीने स्त्री शक्ती चा जागर केला. हळदी कुंकू, उखाणे घेऊन या सारख्या कौटुंबिक कार्यक्रमाने या कृषी महोत्सवाची सांगता झाली.
==============
**रवी दांडगे*
अमरावती**
Comments
Post a Comment