*कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी आय टी आय चे एक पाऊल पुढे......* 

==============

 *स्कुल कनेक्ट  सप्ताह साजरा....* 

==============

अमरावती विभागातील सर्व माध्यमिक शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील  उपलब्ध व्यवसाय अभ्यासक्रम त्याची उपयुक्तता,रोजगार स्वयं रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राप्त केलेले संपूर्ण कौशल्य, विभागाच्या विविध योजना याबाबतची सविस्तर माहिती शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कुल कनेक्ट  वीक कार्यक्रमात देण्यात आली.विद्यार्थ्यामध्ये व्यवसायभिमुख अभ्यासक्रम व तंत्र प्रशिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी २०२३ या प्रवेश सत्रापासून प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत अधिक भर पडून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावा या उद्देशाने खात्याच्या प्रधान सचिव मा. मनीषा वर्मा व राज्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक माननीय दिगंबर दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार व सह संचालक मा.प्रदीप घुले यांच्या अंमल मध्ये दिनांक १२ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२२ हा सप्ताह स्कूल कनेक्ट विक म्हणून संपूर्ण विभागात साजरा करण्यात आला. या अभियानात आपल्या आयटीआयचे ब्रँड ॲम्बेसिडर  म्हणून सर्व शिल्प निदेशकांनी आपली भूमिका चोख बजावली. विभागातील सर्व माध्यमिक शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना आप आपल्या संस्थेबाबत माहिती देऊन त्यांच्यामध्ये एक उत्सुकता निर्माण केली जेणेकरून येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून ग्रामीण भागापासून ते शहरी  भागांमधील दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपला कौशल्य विकास साधण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घेतील.

 आज भारतात कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी  पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी ह्यांनी कुशल भारत  आत्मनिर्भर भारत होण्यासाठी कौशल्य विकासाकडे अधिक लक्ष दिले आहे.त्या अनुषंगाने स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी शासकीय यंत्रणा तसेच उद्योजकांच्या समावेषा सह समिती गठीत करण्यात आलेली आहे. कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना देण्यासाठी व स्थानिकांना रोजगार मिळेल यासाठी स्थानिक एमआयडीसी मधील कंपन्यानी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास रोजगार व पर्यटन मंत्री मा.मंगल प्रभात लोढा त्यांनी नुकतेच केलेले आहे. स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी उद्योजकांनी त्यांना आवश्यक असलेल्या कौशल्य युक्त मनुष्यबळाची मागणी नोंदवावी. आयटीआय विभागात उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेल्या कौशल्यावर आधारित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पुरविले जाईल यामुळे कंपन्यांना आवश्यक प्रशिक्षणासह स्थानिक उमेदवार उपलब्ध होतील आणि त्यामुळे स्वयंरोजगाराचे प्रमाण वाढीस लागेल.

       आता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आपली कात टाकत आहे म्हणजे संपूर्ण आयटीआयचे नूतनीकरण करण्यात येत आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वर्चुअल क्लासरूम,अद्यावत प्रयोगशाळा,प्रशिक्षण कालावधीत कारखान्यांना भेटी देणे, उद्योगधंद्यातील तज्ञांचे व्याख्याने व मार्गदर्शन, कॅम्पस इंटरव्यू आयोजित करणे, प्रशिक्षण संपताच शिकाउ उमेदवारी भरती मेळाव्यामध्ये विविध नामांकित औद्योगिक आस्थापनामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणे.दोन वर्षीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना अभियांत्रिकी पदवीका अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो.अशा विविध उपक्रम व सुविधेबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांना पोटतीडकीने शिल्पनिदेशकांकडून सांगितले जात आहे.या पाच दिवसाच्या साप्ताहमध्ये आय टी आय मधील कार्यरत शिल्पनिदेशकानी आतापर्यंत शेकडो शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. ही कौतुकाची बाब आहे. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापनानी सुद्धा स्वागतच केले आहे.

 *आय टी आय चे उपक्रम*.....

 आय टी आय मधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेतर्गत प्रवेश सत्र ऑगस्ट २०२३ मध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने एक व दोन वर्षीय कालावधीच्या विविध व्यवसाया मध्ये, अभ्यासक्रमामध्ये प्रवेश प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे व तो सबमिट करेपर्यंत च्या सुविधा अत्यंत अल्पदरात पुरविण्यात येणार आहे.

आयटीआय मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींसाठी वसतिगृह, पी.पी.पी.तसेच स्ट्राईव्ह योजनेअंतर्गत मुला मुलींच्या सक्षमीकरणाकरिता त्यांना जाणे येण्यासाठी लागणारा प्रवास खर्च दिला जाणार आहे,अल्पसंख्याक प्रशिक्षणार्थ्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. आयटीआय ने काही सामंजस्य करार केलेले आहेत या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आयटीआय मधील प्रशिक्षण सुविधांचा दर्जा वाढविणे,प्रशिक्षणार्थ्यांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणे,ऑन जॉब ट्रेनिंग, रोजगाराच्या संधी, शिल्पनिदेशकाला व्यवसायाचे आधुनिक प्रशिक्षण देणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आय टी आय कडे प्रवेश घेण्या बद्दलचा कल वाढलेला आहे.

या स्कुल कनेक्ट वीक उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक दुणावला आहे. या सप्ताहच्या माध्यमातून कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडवीण्यासाठी आय टी आय चे एक पाऊल पुढे आहे एवढेमात्र निश्चित.

==============

 **रवींद्र दांडगे* 

शिल्पनिदेशक

आय टी आय अमरावती.*

Comments

Popular posts from this blog